Friday, May 1, 2015

मैत्र जीवांचे ......

पूर्व माहिती:
मूलद्रव्य नाम: स्नेह मेळावा किंवा Get Together
संक्षिप्त नाम: GT
मूलद्रव्य क्रमांक: साधारणतः 10. पण क्वचित प्रसंगी 12, 15/16 किंवा 4 सुद्धा असू शकतो. (काही वेळा हे मूलद्रव्य व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर पण आढळून येते, परंतु त्यातले बंध हे घनिष्ठ असतीलच असे नाही!) 10 क्रमांकाचा मूलद्रव्य शक्यतो लवकर तयार होतो आणि बरेच वर्ष टिकून राहतो, असा एक प्राथमिक निष्कर्ष आहे!!
इलेक्ट्रॉन संख्या: फिक्स नाही, वेळोवेळी बदलत असते! बऱ्याचदा हे इलेक्ट्रॉन्स एकएकटे किंवा छोट्या गटात आढळतात. फक्त वर्षातून एकदा हे इलेक्ट्रॉन्स एकत्र येतात!!

विश्लेषण:
एवढे सर्व लिहिण्याची गरज काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना!! जवळपास प्रत्येक जण GT करत असतोच.. कराडच्या माझ्या  11-12 वीच्या मित्रांचे दरवर्षी GT व्हायचे, पण ते त्यांच्या 10वीच्या बॅच चे... मी दहावीला इंदापूर ला होतो, तेही फक्त 1 वर्ष. स्वभाव पण भिडस्त (??) आणि मितभाषी. त्यामुळे आधीच 10वीचा मित्र परिवार कमी (एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आठवत होते). संपर्क कुणाशीच नाही.. सारखे वाटायचे ते सगळे मस्त GT करत असतील. आपण कुणाला ओळखत नाही, ह्या समान न्यायाने आपल्याला पण कुणी ओळखणार नाही, असा (गैर)समज !! टाळी काही एका हाताने वाजत नाही, मी एकदाही इंदापूर ला जायचा प्रयत्न केला नाही किंवा आपले वर्गमित्र कुठे असतील हे शोधले नाही.. सुनीत पारीख एकदा भेटला होता, मध्यंतरी तो e-संपर्कात होता, नंतर तो परदेशी गेला आणि त्यातही खंड पडला!! त्यामुळे बाकी कुठलेही GT झाले तरी दहावी बॅचचे GT आपल्या नशिबात नाही, अशी खात्री करून घेतली होती 😞

3-4 वर्षांपूर्वी COEP चा मित्र संगमेश्वर याच्याकडून अभिजित कुलकर्णी ची माहिती व मोबाईल नं. मिळाला. अभि आमच्या वर्गातील हुशार विद्यार्थी, पण माझ्या लक्षात राहिला (स्वार्थीपणा, दुसरे काय!!) कारण दहावीला असताना 2 क्लास च्या दरम्यान (इंग्लिश क्लास ते गणिताचा क्लास) मला तो double seat घेऊन जायचा ☺☺👍👍 योगायोगाने अभि मगरपट्टा इथेच काम करतो, त्यामुळे एकदा (हो, एवढे जवळ असूनही आम्ही अजून पर्यंत एकदाच मगरपट्टा मध्ये भेटलो आहोत!!) भेट झाली. त्यानंतर मेल किंवा sms अशा काही e-भेटी झाल्या.. FB वर असलेने एकमेकांचे updates मिळत होते.

एप्रिल २०१५: अचानक एके दिवशी अभि चा फोन आला, 1 मे ला इंदापूर इथे आपल्या दहावीच्या बॅचचे GT आहे, ऐकून मी उडालोच.. इतके दिवस ज्याच्यासाठी मी आतूर होतो, ती गोष्ट घडणार होती, मला आमंत्रण होते. हे पहिलेच GT आहे, असे ही अभिकडून मिळाले.. कसलाही विचार न करता मी लगेच माझा होकार सांगून दिला!!
अतुल दप्तरदार, अजून एक लक्षात राहिलेला मित्र.. बऱ्याच वेळा एकत्र अभ्यास (??) केला होता ना! अतुलचा नं. अभिकडून मिळाला आणि इंदापूरला सोबत जायचा प्लॅन फिक्स झाला. एका whatsapp ग्रुप वर add झाल्यामुळे पुष्कळ जणांची 'नाव ओळख' सुरु झाली.
१ मे २०१५:  आणि तो दिवस उजाडला. अतुल, मी आणि अजून एक अतुल, आम्ही तिघे 11 वाजता शाळेत पोचलो.. शाळेचे अंधुक चित्र आठवत होते, ते हळूहळू स्पष्ट व्हायला लागले...सरस्वतीची मूर्ती, शाळेची बिल्डिंग, आमचा वर्ग... अर्थात आता शाळेतही बदल भरपूर झाले आहेत. सर्व मित्र परिवार आणि काही शिक्षक सुद्धा होते..frankly speaking, ठोंबरे सर सोडून मी कुठल्याही शिक्षकांना ओळखू शकलो नाही, तीच परिस्थिती मित्रांबद्दल.. नावओळखी वरून चेहरा जुळवणे सुरु होते!! बऱ्याच मित्राना मी आठवत होतो, हे (आणि वर नमूद केलेला समज चुकीचा होता) पाहून खूप बरे वाटले तसेच माझी चुकी पाहून वाईटही:(. माझा बेंचमित्र, चंदनशिवे, भेटला, त्याच्याशी खूप गप्पा झाल्या. स्वप्नील, आनंद, अनिल, अमित हे हळू हळू आठवायला लागले. 'अ' तुकडीतील मित्र आठवत नव्हते, त्यामुळे बाकीच्या तुकडीतील आठवणे अशक्यच.
शाळेच्या नवीन (at least माझ्यासाठी तरी) बिल्डिंग मध्ये इंदापूरवासी मित्रांनी GT ची व्यवस्था अतिशय छान केली होती. संतोष ने "या ठिकाणी" सूत्रसंचालन सुरेख करून खेळीमेळीचे वातावरण तयार केले. सरांनी व्यक्त केलेले विचार, वर्गमित्रांनी सांगितलेले किस्से यामुळे GT मध्ये रंगत आली होती.
दुपारच्या जेवणा नंतर भरपूर गप्पा गोष्टीं झाल्या, शाळेसाठी काय काय करता येईल यावर चर्चा झाली. मी थोड्या वेळासाठी आम्ही रहात होतो त्या घरी जाऊन आलो. घर काही लगेच सापडले नाही (!!), थोडे फिरावे लागले. तोपर्यंत इतर मित्रांनी वर्गात जाऊन थोडा दंगा करत जुने काही आठवणींचे क्षण जागे करण्याचा प्रयत्न केला.
आता प्रत्येक वर्षी GT करायचे, असे ठरवूनच पहिल्या GT ची सांगता झाली आणि आम्ही परत पुण्याकडे यायला निघालो !!
मित्र परिवार जपायचा आणि वाढवायचा ही सवय, आता त्यात अजून भरपूर मित्र (आणि मैत्रिणी सुद्धा) add झाले.. एक अपुरे राहिलेले स्वप्न साकार झाले !!
"आठवणीतील शाळा आणि शाळेतीले मित्र
विसरून जाता सारे, लक्षात फक्त ते नाव,
मम म्हणे, होता 1 GT झाले अजोड मैत्र
अन् अंतरी उमटून आले एक प्रसन्न भाव!"