Wednesday, September 14, 2016

भटकंती: दूधसागर धबधबा

        चेन्नई एक्सप्रेस चित्रपट पाहत असताना मनात विचार आला, एकदा तरी दुधसागर धबधबा पहायला हवा ! तसे या धबधब्याबद्दल ऐकून होतो, ट्रेन च्या ट्रॅक वरून चालत जाऊन हा धबधबा पाहता येत होता. (हो होता... आता ट्रॅक वरून चालायला बंदी केले आहे). योगेश पडोळेने 13 एप्रिल ला या ट्रेक बद्दल ग्रुप वर पोस्ट टाकले. Explorers ग्रुप ने हा ट्रेक आयोजित केला होता, त्यामुळे हा धबधबा कसा पहायचा, रस्ता कसा शोधायचा इ. प्रश्न सुटले असे वाटले होते.

        सर्वांचे भराभर होकार आल्याने 10 मे ला आम्ही बुकिंग करून घेतले. आधी 30-31 जुलै तारीख ठरली होती, ती काही कारणास्तव 6-7 ऑगस्ट करावी लागली. Explorers नी सांगितल्याप्रमाणे आधी 20 लोक ठरले होते, त्यात हळू हळू भर पडत 23, 28 आणि शेवटी 31 लोक झाले. 6 तारखेला सर्व जण 3:30 वाजता पुणे स्टेशन वर जमलो होतो पण गोवा एक्सप्रेस ट्रेन लेट होती. सगळ्यांची ओळख, गप्पा गोष्टी आणि सटर फटर खरेदीमुळे टाईमपास झाला.
 

        कुणी कुठे बसायचे हे आधीच ठरवून झाले होते. स्वप्नील-सई, अतुल-प्रियांका, अनंत-भाग्यश्री, पुष्कराज, अनघा-मी असे 9 जण एकत्र होतो. त्यामुळे ट्रेन प्रवासात धमाल आली. सकाळी 3 वाजता उठायचे म्हणून घरातून आणलेले डबे संपवून सर्व जण 10-10:30 ला लवकर झोपलो होतो (म्हणजे प्रयत्न केला होता, हे सकाळी उठल्यावर सगळ्यांच्या बडबडीवरून समजले.. मात्र, अतुल मस्त गाढ झोपला होता यावर सर्वांचे एकमत होते!!). सर्वाना 2:30 वाजल्यापासूनच (न झोपलेल्या लोकांची) उठविण्याची लगबग सुरु झाली... मग असे दुसऱ्याची झोपमोड करायचे सुख कुणी सोडते का!! चार बोगी मध्ये विखुरलेले सर्वजण 3:30 पर्यंत 2 बोगी मध्ये जमा झाले. सोनोलीयम नामक प्लॅटफॉर्म नसलेल्या स्टेशन वर ट्रेन फक्त 30 सेकंद थांबते, तेवढ्याच वेळात आम्हां सर्वाना (काहींना अर्धवट झोपेत) खाली उतरायचे दिव्य करायचे होते. येताना धबधब्याचा आवाज ऐकू आला, तसेच काही तुषार ही अंगावर झेलता आले. ट्रेन लेट असल्याने 4:45 वाजता स्टेशन आले, सर्व खाली व्यवस्थित उतरले (आणि मोठा हुश्श्शश्श्शश केला).

        सोनोलीयम गावात जमून ट्रेक लीडर ने सर्व हजर डोक्यांची मोजणी केली, नंबर जुळल्यावर काही आवश्यक सूचना केल्या आणि सर्व जण या जंगल ट्रेकसाठी मार्गस्थ झाले. आधी जंगल ट्रेक म्हणजे जंगलामधील वाट असे वाटत होते, परंतु चालायचा सडक (रस्ता) सोपा होता आणि बाजूने गर्द झाडी होती. उजाडले असल्याने सर्वांचे फोटोग्राफी स्किल चेक करणे सुरू होते. सभोवतालची ग्रीनरी, हिरवेगार डोंगर आणि त्यावर चाललेली ढगांची पळापळ !! खरेच अप्रतिम दृश्य होते.. थोड्याच वेळात एक पाण्याचा मोठा आणि वेगवान प्रवाह लागला. लीडर ने लगेच मला व अतुल ला बोलावले, हात वर केले आणि यापुढे आपण जाऊ शकत नाही, असे जाहीर केले. लीडर कडे रोप, बेल्टस आणि क्लिप्स होत्या. मी विक्रम आणि योगेश शी चर्चा केली आणि हा प्रवाह पार करायचे ठरवले. यथावकाश आधी रोप घेऊन विक्रम आणि नंतर हळू हळू सर्व टिम नी प्रवाह पार केला.






        परतीच्या प्रवासाला लागेल म्हणून रोप तसाच ठेवला होता. साधारण 2 तासात दुधसागर धबधब्याचे दर्शन झाले आणि आम्ही लगेचच तिथल्या पार्क मध्ये पोचलो. धबधब्याचे दृश्य अतिशय विहंगम होते.


       टॉवर वरून view छान होता, परंतु धबधबा बॅकग्राऊंड ला घेऊन फोटो काढणे अजिबात जमत नव्हते. धबधब्यावर प्रकाशाचा तीव्रपणा (brightness) जास्त असल्याने चेहरा व्यवस्थित येत नव्हता. Suddenly माझ्या डोक्यातली ट्यूब पेटली आणि चेहऱ्यावर मोबाईल चा उजेड पाडून पाहिला..युरेका !! (नुसते ओरडलो, *** पळत नाही सुटलो!!). मग काय, सर्वांची फोटो काढून घ्यायची लगबग सुरु झाली ना.. इथे फोटोग्राफी सोबत लोकांचे modelling स्किल्स पण दिसून आले :). डोहामध्ये मस्त खळाळते पाणी होते, पण लीडर नाही म्हटल्याने आम्ही त्याचे (चडफडत) ऐकले आणि ग्रुप फोटो काढून परतीला लागलो.
       सोनोलीयम ला आल्यावर गरमा गरम पोहे (वरून शेव आणि सोबतीला बाकरवडी) आणि चहा झाला. परतीचा प्रवास निम्मा जंगलातून आणि निम्मा रेल्वे ट्रॅक वरून होता. येताना पुन्हा एक छोटा प्रवाह लागला, ज्यामध्ये बहुतेक सर्वांनी भरपूर दंगा केला, भिजलेल्याला अजूनच भिजवून आनंद (की मागचा राग) व्यक्त केला!



       ट्रॅकवरून चालायला फक्त 10-15 मिनिटेच मजा आली, नंतर फार वैताग आला होता. नुकताच पडलेल्या पावसामुळे आलेला हवेतील गारवा, आसपासचे निसर्ग सौंदर्य आणि ढगांमुळे झाकला गेलेला सूर्य यामुळे त्रास झाला नाही इतकेच. कुलेम गावात येऊन जेवणावर मस्त ताव मारला.




        कपडे बदलताना एका जळूने मनसोक्त रक्तपान केल्याचा जलवा डाव्या पायावर दिसला! परतीची  पुण्याची ट्रेन 4:30 ला होती. स्टेशनवर पूर्वजांचा जबरदस्त गोंधळ सुरु होता. त्यांना स्पर्धा (किंवा जनुकीय साधर्म्य म्हणा) म्हणून आम्हीही गोंधळ (पुणेरी सभ्यपणा जपत बरं का!!) सुरु केला.
येताना धबधबा जवळून पहायचा म्हणून सर्वजण ट्रेन च्या दरवाजा आणि खिडकी मध्ये दबा धरून अनुक्रमे उभे व बसले होते. आधी ट्रेन च्या डावीकडून संपूर्ण धबधबा आणि नंतर उजवीकडून काही फुटांवरून पडणारा फेसाळता धबधबा हे दृश्य जबरदस्त होते.



          ट्रेनच्या बोगीमध्ये आमचा अड्डा पुन्हा जमला होता. Dumb charades वरून गाडी अंताक्षरीच्या रुळावर आली. यावेळी त्यात मिथिलेश, ट्रेक लीडर आणि इतर असे हळू हळू वाढत गेले आणि सोबत आमचा आवाज सुद्धा ! शेवटी पोलीस मामांनी आम्हाला शांत केल्यामुळे आमची सुरेल शताब्दी एक्सप्रेस पुन्हा dumb c पॅसेंजर च्या रुळावर आली. Dumb C मुळे तोंड बंद होते, ते बेळगाव आल्यावर जेवणासाठी पुन्हा उघडले.
सोमवारी सगळा दिवस workshop असल्याने लगेच पडी मारली. संपूर्ण ट्रेक मध्ये जेवढी मजा आली त्यापेक्षा डबल मजा आणि धमाल दोन्ही वेळच्या ट्रेन प्रवासात आली!!