Thursday, January 5, 2017

अनोखी कोजागिरी

फॅमिली ट्रेक (लहान मुलांना सोबत घेऊन) करायचे ठरले होते. मुक्काम ही करायचा आणि लहान मुलांना सोबत घेऊन ट्रेक करायचा, तर किल्ला व्यवस्थित असावा आणि मुलांना झेपेल असाही असावा. बरेच दिवस हरिश्चंद्रगड झाला नसल्याने तो ट्रेक करावा असे एक मत होते. तसा पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड सोपा आहे आणि मुलांना जमले पण असते. फक्त अडचण एकच, पुण्यापासून पाचनई लांब असल्याने आदल्या दिवशी जाऊन तिथे मुक्काम करावा लागला असता. ट्रेक च्या 2 आठवडे आधी लक्षात आले, राजगड जवळ आहे तसेच पाली मार्गे छोटा ही! आम्ही नेहमी गुंजवणे मार्गे राजगड केला आहे, त्यामुळे पाली मार्गे कसे जायचे याचा अभ्यास केला आणि राजगडला जायचे पक्के केले. 
मी आणि विराज सिंहगड रोड वरून आणि अनंत व अतुल हडपसर वरून निघालो. कैलासला दोन्ही गाड्या एकत्र आल्या आणि आम्ही मस्त भाकरी पिठल्याचे जेवण हाणले!!! अनायसे शनिवारी कोजागिरी असल्यामुळे ती गडावर साजरी करायची होती. अतुलने आणलेल्या किटलीमध्ये दूध तापवून घेतले. पाली गावात पार्किंगची सोय आहे, पण गाडी अजून वर जाऊ शकते म्हणून साधारण 1 किमी पुढे जाऊन आम्ही गाड्या पार्क केल्या.

 गाडीतून उतरल्यावर पद्मावती माची पाहून जरा धस्स झाले होते. अपेक्षेपेक्षा किल्ला जरा उंचच वाटत होता. याउलट सर्व मुले खूष दिसत होती. सर्वजण आपापल्या पाठीवर छोटी सॅक अडकवून निवांत चालत होते. अथर्व आणि विराज सर्वात पुढे होते. साधारण सिंहगडाच्या उंचीवर पाली दरवाजा पाहून 2 तासाची अटकळ बांधली होती (जी अगदी बरोब्बर ठरली!!). थोड्याच वेळात पाठीवरचे ओझे चांगले जाणवू लागले होते. तासाभराने मुले पण जरा कंटाळू लागली. सर्वात छोटा श्लोक (3 वर्षे) full2 enthu दिसत होता. शेवटचा पॅच पायऱयांचा असल्याने सोपा असेल असे वाटले होते. शेवटी शेवटी मुले पण कंटाळली (म्हणजे ते तसे स्पष्टपणे सांगत होती, मोठ्याना ते जमत नव्हते!!).

कोजागिरी निमित्त गडावर भरपूर गर्दी होती (अक्षरशः मैदान दर्शकोसे खचाखच भरा हुआ है सारखे), पद्मावती मंदिरामध्ये जागा नव्हती. Luckyly, आम्हाला मंदिराबाहेर पाण्याच्या टाक्या जवळ जागा मिळाली आणि आम्ही लगेच तंबू टाकून (उघडून) जागा बुक करून टाकली. मुले जरी दंगा करत होते तरी चेहऱ्यावरून थकवा दिसत होता. खालून येताना दूध तापवूनच आणले होते, मुलांनी लगेच न कुरकुरता पिले. अंधार पडायला सुरुवात झाल्याने आम्ही लगेच कूकिंग कडे मोर्चा वळवला. यावेळी विराज आणि भाग्यश्री यांनी कूकिंग सांभाळल्यामुळे मी आणि अनंत मुलांकडे बघत होतो. टोमॅटो सूप आणि पापड पाहून मुले जाम खुश दिसत होती. सूप आणि पराठा खाऊन झाल्यावर मुले लगेच पेंगूळली आणि झोपी गेली (मृण्मयी एकटी जागी होती, तिला आम्ही काय काय करतो ते एन्जॉय करायचे होते).

कूक्स नी आमच्यासाठी मस्त मुगाच्या डाळीची खिचडी आणि गरमागरम मसालेदार दूध बनवले होते. अंधाऱ्या रात्री (पोर्णिमा असली तरी चंद्र ढगाआड होता) टॉर्चच्या उजेडात कोंडाळे करून जेवण्यात मजा काही औरच !! जेवणानंतर नेहमीप्रमाणे पत्त्यांचा डाव (हँडल) झाला. मध्यरात्रीच्या सुमारास मसालेदार दुधामध्ये चंद्रदर्शन घेऊन दुग्धप्राशनाचा कार्यक्रम पार पाडून सर्वजण आपापल्या टेन्टस मध्ये झोपायला गेले. विशेष म्हणजे मृण्मयी (एवढे दमून पण) शेवटपर्यंत जागी होती!!

उगवत्या सूर्याचे (डोळे चोळतच) दर्शन घेऊन सकाळ उजाडली. सुवेळा माची पहायचे ठरले होते, पण मुलांना एवढे चालून परत उतरायला जमले नसते. म्हणून अनघा, भाग्यश्री, अतुल व विराज सुवेळा माचीकडे गेले आणि अनंत, प्रीती आणि मी मुलांपाशी थांबलो. सकाळच्या फ्रेश वातावरणात मुले मस्त एन्जॉय करत होती. त्यांना ब्रेकफास्ट ला मॅगी दिल्यावर तर सर्वांच्या चेहऱ्याची कळी खुलली होती. आम्ही सर्व भांडी साफ करून, टेन्टस बंद करून तयार होतो. सुवेळा वरून टीम परत येताच आम्ही पोहे, चहापान करून परतीच्या मार्गाला लागलो. 
वाटेत फोटो सेशन्स करत करत 12 च्या सुमारास आम्ही खाली उतरलो. उतरताना बच्चे कंपनी विना कुरकुर उतरले, हे पाहून आम्ही सर्व खूष.... आता मुलांना घेऊन ट्रेक्स करायला हरकत नाही!!

#मम