Monday, August 22, 2016

अमेरिकेतील महाराष्ट्रीयन पाहुणचार

या वर्षी अमेरिकेला धावती भेट द्यायचा योग आला. अमेरिकेला जायचे फिक्स झाल्यावर लगेच तिकडील सर्वांना कळवून टाकले. यावेळची अमेरिका वारी चांगलीच सुखकारक होणार याची कल्पना होती. अर्थात तसे व्हावे असेच प्लॅंनिंग ही केले होते म्हणा!! जेमतेम 7 दिवसांची ट्रिप होती, तरीही मला 3 वेळा अनपेक्षित पणे महाराष्ट्रीयन पाहुणचार आस्वादायला मिळाला !

पाहुणचार # १:
शनिवारी शिकागो विमानतळावर उतरल्यावर दुर्गा आणि वहिनी मला न्यायला आले होते. अमेरिकेची ही काही पहिली वारी नव्हती, तरीही कुणी तरी आपल्याला न्यायला आले आहे याचे अप्रूपच काही और, नाही का!  दुर्गा स्वतः कार ड्राइविंग करत आली होती. 
घरी जाऊन फ्रेश झाल्यावर गप्पा मारत बसलो. भूक नव्हतीच, तरी ही चहा सोबत चिवडा, मग त्यात कांदा टोमॅटो घालून सेमी (अमेरिकन उच्चार 'सेमाय') भेळ आणि नंतर पुलाव खाल्लाच! ☺☺.
घरी आल्यावर मला झोपून न देण्याचा दुर्गाचा प्लॅन होता. त्यासाठी घराबाहेर पडायला हवे ना! आम्ही घराजवळील एका बहाई प्रार्थना स्थळ बघायला गेलो. कार असलेने खूप च जवळ वाटले. निळ्याभोर आकाशाच्या बॅकग्राऊंड मध्ये शुभ्र असे प्रार्थना स्थळ आणि सभोवतीचे 8 छोटे बगीचे छान वाटत होते. त्यानंतर आम्ही Northwestern University, जिथे दुर्गा ने मागील वर्षी MS पूर्ण केले, ते पहायला गेलो होतो. मिशिगन लेक (समुद्रच म्हणायचा) ची बाजू लाभलेले, हिरव्यागर्द झाडीने नटलेले कॅम्पस दुर्गाच्या नजरेतून बघताना मस्त मजा येत होती. लेकच्या काठावरून शिकागो ची स्कायलाईन अप्रतिम दिसत होती. व्यवस्थापन (Management) शिक्षणासाठी प्रसिद्ध अशा Kellogg's स्कूल पाहून आम्ही दुर्गा चे ऑफिस आणि लॅब्स बघायला गेलो.
बहाई प्रार्थना स्थळ 
Kellogg's School of Management

पिझ्झा खायची इच्छा नव्हती, पण एक चांगला पिझ्झा (Blaze Pizza) मिळतो असे दुर्गा म्हणाली, म्हणून आम्ही 1 पिझ्झा खाल्ला व त्यानंतर त्या भागातले सर्वात चांगले क्रीमचे Andy's ice cream खाल्ले.
घरी यायला 8:30 झाले होते. जेवायला वहिनीने गरमागरम पुरणपोळी केली होती. अमेरिकेत पुरणपोळी खायला मिळत होती, माझा विश्वासच बसत नव्हता !!

पाहुणचार # २:
दुसऱ्या दिवशी मस्तपैकी डोसे खाऊन आम्ही ब्लूमिंग्टन ला जायला निघालो. वाटेत अरोरा (Aurora) येथील मंदिरापाशी थांबून श्री बालाजी चे दर्शन घेतले. तिथे प्रसाद सुंदर मिळतो असे ऐकले होते, परंतु रश्मी गोखले (जोशी) कडे भेटायला आणि जेवायला जायचे असल्याने त्यासाठी थांबलो नाही. 
श्री बालाजी मंदिर, अरोरा, शिकागो

ब्लूमिंग्टन इथे आम्ही प्रथम श्री गिरीशजी शिरसाळकर यांच्याकडे भेटायला गेलो होतो, तिथे गुलाब जामून (sweet balls dipped in sugar syrup) चाखायला मिळाले. तिकडे आम्हाला न्यायला रश्मी आणि चि. शरमन आले होते. 
रश्मी च्या घरी गेल्यावर सचिन व रश्मी शी गप्पा-टप्पा , ओळख (?) झाली. ओळख अशा साठी की रश्मी आणि मी दहावीला वर्गात एकत्र होतो, पण त्यानंतर कधीही भेट झाली नव्हती. नव्या युगाच्या व्हाट्सअप्प नामक गोष्टीमुळे पुन्हा नव्याने भेट घडून आली. त्यामुळे या अमेरिका ट्रिप मध्ये भेटायचे ठरवले होतेच. सचिन व रश्मी दोघे ही बोलके (की बबडे ?) असल्यामुळे गप्पा रंगात आल्या होत्या.
सचिन, रश्मी, चि. शरमन

रश्मीकडे जेवणाचा (सॉरी मेजवानीचा) जबरदस्त मेनू होता. कुर्मा, पुरी, पुलाव, कुरडई याबरोबर माझा सर्वात मोठा वीक पॉईंट श्रीखंड पण होते. अमेरिकेत बऱ्याचदा क्रीम आणून श्रीखंड केले जाते, पण हे श्रीखंड घरी दही लावून, नन्तर टांगून त्याचा चक्का करून केले होते. अहाहा, केवळ अहोभाग्य!! श्रीखंड चांगले झाले असले तरी मी लाजत लाजत 3 च वाट्या खाल्या ☺☺.
संध्याकाळी मला सोडायला सचिन, रश्मी आणि शरमन (बिच्चारा) मोलीन पर्यंत आले होते. मोलीनला निघण्यापूर्वी घरी कैरीचे पन्हे आणि चहा पण झाला. 👌👌
(श्रीखंडाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे 👌👌)
पाहुणचार # ३:
ऑफिस मधला मित्र गिरीश मरकळे सध्या मोलीन ला असतो. त्याने ही अमेरिकेला येण्याआधी जेवणाचे आमंत्रण दिले होते, पण कमी दिवस असल्यामुळे हा योग जमून येईल याबाबत मी शाशंक होतो. पण, पण, पण..मृण्मयी म्हणते तसे, जे होणार आहे ते होणारच !! आणि गिरीश कडे जेवायला जायचे ठरले...दिवस पण किती छान, नारळी पौर्णिमा !! मेनू?? बरोबर ओळखलंत.. अर्थातच नारळी भात 👌👌. Mrs. गिरीश ने सांगितले की त्यांनी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे, पण खाताना असे जाणवलेच नाही!! त्यादिवशी नारळी भातावर (उभा की आडवा, की दोन्ही??) मस्त हात मारला. चि. मिहीर आणि चि. मैत्रेयी बरोबर थोडा वेळ खेळ, मस्ती करत संध्याकाळ अतिशय मस्त गेली!!


असे हे 3 अमेरिकेतील महाराष्ट्रीयन पाहुणचार.. वाटले नव्हते असे काही घडेल, पण तीन तीन महाराष्ट्रीयन पदार्थ ते ही महाराष्ट्रीयन गृहिणींकडून खायला मिळणे, वा..नशीब असावे तर असे !!

गेलो होतो परदेशी, देश अमेरिका
चाखणार होतो विदेशी पदार्थांचा जायका ।
खाल्ले थाई, इटालियन नी मेक्सिकन,
सोबत खाऊन आलो आपले महाराष्ट्रीयन !!

#मम

2 comments:

myharshal said...

पुण्यात पण बहाई प्रार्थना स्थळ आहे। फातिमा नगर चौकात। बघून घे।
Keloogg चे कॉर्नफ्लेक्स खाल्ले होते मी, ते त्या keloogg च्या university त च बनतात का?

महेश मसुरकर said...

पाहिले आहे ते बस मधून जाताना...
@kellogg's, no comments !!!