माझा मित्र प्रदीप आरोटे याने राजगड तोरणा ट्रेकचे केलेले शब्दांकन.
तुम्हास नक्कीच आवडेल ही अपेक्षा.
सर्वात शेवटी विराज ने केलेल्या छोट्या विडिओ ची लिंक टाकली आहे.
------------------------------
आमच्या ट्रेक ची तयारी तेव्हाच सुरु झाली जेव्हा व्हाट्सअप ट्रेकिंग ग्रुप वर ट्रेकिंग चा प्लॅन झळकला. ट्रेक चा रूट होता राजगड पायथा - राजड - तसेच डोंगरा डोंगरा ने चालत तोरणा -> तोरणा पायथा. खूप दिवस असा ट्रेक करायचे मनात होते. कारण असा ट्रेक करायची फक्त इच्छा असून चालत नाही तर चांगली सोबत लागते (ट्रेकचा रूट माहिती असावा लागतो). वातावरण योग्य लागते (पावसाळ्यात असे मुक्कामी ट्रेक करणे खूपच धोक्याचे आणि कठिण असते). सगळे जुळून आले होते. मला वाटते असा योग येणे माझ्यासाठी तरी पुढे कठिण होते. लगेच महेश सोबत संपर्क साधून काही जुजबी माहिती घेतली आणि मी पण येणार आहे असे त्याला सांगून टाकले. बाकी “मी काही सोबत घेऊ का ?” असे विचारले असता तो म्हणाला कि “सगळी व्यवस्था आम्ही करू, तू फक्त कपडे आणि बेडींग सोबत ठेव.”
झाले, शुक्रवार चा दिवस उगवला नि संध्याकाळी मी महेशच्या घरी हजर झालो. जेव्हा त्याच्या घरी पोहोचलो, तेव्हा महेशच्या घरचे त्याची पॅकिंग करण्यात मग्न होते. पाहून वाटत होते कि त्याच्या घरच्यांना महेश पेक्षा जास्त प्रॅक्टिस झालीय महेशच्या ट्रेकिंगसाठीच्या पॅकिंगची. महेश आणि मी जेव्हा त्याच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा बाकीच्यांची जमवाजमव आम्ही चालू केली. आम्ही एकूण ८ जण होतो. त्यापैकी अतुल नि स्वप्नील अगोदरच एक कार घेऊन पुढे गेले होते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी. बाकी आम्ही ६ जण पाठीमागे राहिलो होतो. आता ६ जण एका कार मध्ये जाणार कसे ? परंतु महेशने जेव्हा चौकशी केली तेव्हा कळाले कि घ्यायला येणारी कार फॉर्च्युनर आहे. मनात विचार आला, इतका श्रीमंत ट्रेकर कोण भाऊ ? तो पण आमच्या बरोबर ? हः हः हः !
कार आली नि आम्ही सगळे आरामात बसलो. स्वप्नील आणि अतुल यांनी ऑर्डर दिलेले जेवण केले एका हॉटेल मध्ये आणि एक कार तिथेच पार्क करून गुंजवणे गावात, राजगडच्या पायथ्याला हजर झालो रात्री १०:३० ला. कार पार्क करून जेव्हा राजगड चढायला सुरुवात केली रात्रीचे १०:३५ वाजले होते. चंद्र पूर्णाकृती असल्यामुळे बॅटरीची अजिबात आवश्यकता भासत नव्हती. महेशने चांगला मुहूर्त निवडला होता. आम्हाला जास्त जण येतील अशी अपेक्षा होती, पण ८ जण सुद्धा चांगला रिस्पॉन्स होता. पहिले २ वेळा राजगड
ला ट्रेक केल्यामुळे रस्ता तसा माहितीचा होता. सरावाने चढत होतो. थोड्या फार अंतरावर
सगळेच वाट चालत होते. पहिला मोठा चढ पार झाला नि पठारावर पोचलो.
सगळयात जास्त वजन पाण्याचे
होते. रितेशने आमच्यासाठी जास्त पाणी सोबत घेतले होते. रितेश, मिलिंद नि उन्मेष दुसऱ्या
दिवशी सकाळीच परत राजगड उतरणार होते, त्यामुळे त्यांना पाण्याची जास्त आवश्यकता भासणार
नव्हती. एका ठिकाणी थांबलो तर एक एक जण पाठीमागून येऊन आम्हाला मिळू लागला. सगळ्यात
शेवटी महेश नि रितेश पाण्याची पिशवी सांभाळत आमच्यापाशी आले. मला असे जाणवले कि रितेशला
ती पिशवी घेऊन चालताना त्रास होत आहे. थोडा वेळ थांबून जेव्हा आम्ही परत वाट चालू लागलो,
मी रितेश कडून ती पाण्याची पिशवी घेतली आणि पुढे निघालो. पहिले काही अंतर जास्त त्रास
झाला नाही, पण जेव्हा रॉक क्लाइम्बिंगचे पॅच आले, तेव्हा त्या पाण्याच्या बॅगने त्रास
द्यायला सुरुवात केली.
पाठीवर कितीही वजन असले तरी
त्याचा जास्त त्रास नाही जाणवत. ट्रेक करताना, मुख्य म्हणजे रॉक क्लाइम्बिंग वेळी दोन्ही
हात मात्र मोकळे हवेत. परंतु आता मात्र इलाज नव्हता. मी, अतुल नि स्वप्नील आघाडीवर
होतो. माझा प्लॅन होता कि रेकॉर्ड वेळेत राजगडवर पोचायचे. झप झप निघालो. लवकरच रेलिंग
लागले. समजले कि आता तटबंदीजवळ पोचलोय. रात्र असल्यामुळे जास्त थकवा येत नव्हता. शेवटचा
रॉक क्लाइम्बिंगचा पॅच चढून जेव्हा गेलो, किल्ल्याची तटबंदी मधील छोटासा दरवाजा समोर
होता. त्यामध्ये वाकून प्रवेश केला नि इकडचे पोचलो राजगडावर. पाण्याच्या टाक्याजवळ
पोचलो, नि थंड वाऱ्याने आमचे स्वागत केले. थोडाफार थकवा सुद्धा कुठल्याकुठे पळून गेला.
वेळ पहिली तर बरोबर १२:०० वाजले होते. म्हणजे १ तास २५ मिनिट्स मध्ये आम्ही राजगडावर
पोचलो होतो. हळूहळू सगळेच पाठीमागून येऊन पोचले. आता फोटोसेशन ची वेळ होती. आम्ही ८
जण.
|
राजगडावर पोचलो तेव्हा: डावीकडून निळ्या टीशर्ट मध्ये मी नंतर मिलिंद, रितेश, विराज, महेश, अतुल आणि सगळयात उजवीकडे स्वप्नील |
आता मुक्कामाची जागा गाठायची होती. पुण्यातून निघताना थंडीचा (चुकीचा) अंदाज लावला होता, म्हणून काही गरम कपडे सोबत आणले नव्हते. जे काही वजन होते ते फक्त ४ लिटर पाण्याचे होते. पण गडावर गेल्यावर थंडीबद्दलचा अंदाज साफ चुकला. चांगलीच थंडी होती. आणि थकवा दूर झाल्यावर ती जाणवायला लागली होती. झोपण्यासाठी आडोसा आवश्यक होता. ट्रेक सुरु होण्यापूर्वीच्या "वेळ पडली तर काय, उघड्यावर पण झोपू !" सारख्या वल्गना गडावरच्या थंडीतच विरल्या. काही पायऱ्या चालून गेलो आणि पद्मावती मंदिरामध्ये पोचलो. २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला गेला. या मंदिरात ३ मुर्त्या आहेत. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. राजगड या राहण्याच्या आणि पाण्याच्या सोयीमुळे नाईट ट्रेक करणाऱ्यांसाठी अत्यंत फेव्हरेट डेस्टिनेशन आहे.
आम्हाला चिंता ही होती कि वीकएंड असल्यामुळे अनेक ट्रेकर्स आज येतील आणि मंदिरात त्यामुळे निवाऱ्याला जागा मिळणार नाही. पण अच्छर्य म्हणजे मंदिरात कोणीही नव्हते. विजेची सोय होती. आम्ही देवीचे दर्शन घेऊन लगेच पथारी पसरली आणि अंग टाकले. केव्हा डोळा लागला काही कळाले नाही. सकाळी माणसांच्या गडबडीमुळे जाग आली. लक्ष्यात आले कि आम्ही आल्यानंतर पण रात्री उशीरा अनेक ट्रेकर्स राजगडावर येतच होते. आपण आपल्या विश्वात असताना समजत नाही कि ट्रेक करणारे फक्त आपणच नाही, तर खूप सारे शिवभक्त आहेत. फक्त बाहेर पडायला हवे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जायला हवे. आपण खूप लहान वाटायला लागतो. सगळे उठलो. फ्रेश झालो.
|
राजगडावरील पिण्याच्या पाण्याचं टाकं. |
|
विलग होण्यापूर्वी: डावीकडून पहिला मिलिंद त्याशेजारी अतुल, स्वप्नील, महेश, रितेश, विराज, उन्मेश आणि सेल्फी घेणारा मी. |
आणि आम्ही आता २ गटात विभागले गेलो. रितेश, मिलिंद आणि उन्मेश बालेकिल्ल्याकडे निघाले. किल्ला फिरून पाहून ते परत माघारी जाणार होते. आम्ही त्यांना निरोप दिला. त्यांच्याजवळचे त्यांना गरज नसलेले प्यायचे पाणी आम्ही ५ जणांनी आमच्यासोबत विभागून घेतले. पुढे आम्हाला त्याचीच फार आवश्यकता भासणार होती. निघताना रितेशने सोबत आणलेली स्लीपिंग बॅग देऊ केली. म्हणाला ही हलकी आहे, आणि जास्त जागा पण नाही व्यापणार. आणि तुला तोरणावर हिची आवश्यकता पडेल. मला तर आनंदच झाला. माझ्या जवळचे बेडींग रितेश च्या हवाली केले आणि त्याच्या जवळची स्लीपिंग बॅग मी घेतली. माझ्या सॅक चे वजन आता काही प्रमाणात कमी झाले होते. आम्ही आता ५ जण आमच्या वाटेला लागलो. राजगडावरून तोरणा अगदी समोरच दिसत होता. फारच जवळ !
|
राजगडावरून होणारे तोरणा चे दर्शन |
वरील फोटोमध्ये तोरण्यापर्यंत डाव्या बाजूने जी डोंगर रांग जाते, तीच आमची वाट होती. पुढील काही तास आम्हाला त्याच रांगेतून चालत तोरणा गाठायचा होता. आम्ही सकाळी ८:३० वाजता ट्रेकला सुरुवात केली. आमचा अंदाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत तोरणा गाठायचा असा होता. संजीवनी माचीच्या बाजूने आम्ही किल्ल्याबाहेर पडलो.
|
अळू दरवाज्यामार्गे राजगडातून बाहेर पडताना अतुल, महेश मी नि विराज |
पहिल्यांदा वाटले आम्ही ५ जण आहोत. पण हे काय ! काल रात्री आमच्यासोबत एक कुत्रा आला होता, तो आत्ताही आमच्या सोबत वाट चालू लागला. प्रथम वाटले हा फक्त राजगडावरच आपल्या सोबत येईल. पण तो तोरण्याच्या दिशेने पण आमच्या सोबत निघाला. आम्ही विचार केला कि हा जास्तीतजास्त राजगडाच्या हद्दीपर्यंत साथ देईल. मग आम्ही त्याकडे फारसे लक्ष नाही दिले. पुढे स्वप्नील नि अतुल होतेच. मग मी, विराज नि महेश असा ट्रेक सुरु झाला. स्वप्नील ने माहिती दिली कि राजगड ते तोरणा या ट्रेकच्या अगदी मध्यभागी एक छोटीसी वस्ती आहे, १-२ घरे आहेत. तिथे आपल्याला मधली विश्रांती घ्यायची आहे. तोपर्यंत विनाथांबा वाटचाल करू.
जसे राजगडाच्या बाहेर पडलो, प्रथम खूपच तीव्र उतार लागला. इतके वाईट वाटत होते उतरताना. नाही, इमोशनल वगैरे नव्हतो झालो, वाईट याचे वाटत होते कि इतका जीव काढून हाईट गेन करायची आणि आता ती लूज करतोय. पुन्हा समोर 'इगल्स नेस्ट' टोपण नाव असलेला उंच तोरणा दिसत होता. त्यावर पोचायचे म्हणजे पुन्हा हाईट गेन करावी लागणार होती. पण काय करणार, इलाज नव्हता. हीच एक वाट होती. सोबत भू भू पण चालत होते.
काही ट्रेकचा सराव झाल्यामुळे पळतच उतरायला सुरुवात केली. मला ट्रेक मध्ये दोन गोष्टी एक्सायटिंग वाटतात. पहिले म्हणजे रॉक क्लायंबिंग, आणि दुसरे म्हणजे असे पळत उतार पार करणे. मला वाटते दोन्हीमध्ये कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो. चालत चालत मला एक माझ्या उंचीची काठी सापडली. घरून निघण्यापूर्वी आईने दिलेला सल्ला आठवला. “;या दिवसात गवत पूर्ण नाहीसे झालेले नसेल. मोठी काठी हातात ठेव. आपटत आपटत चल. गवत बाजूला करायला पण तिचा उपयोग होईल वाटेमध्ये”. लगेच काठी उचलून घेतली. उताराने वाटचाल करायला तिचा उपयोग होऊ लागला. माती मोकळी असलेल्या जागी घसरण्याची चान्सेस असतात. अश्या वेळी काठीचा आधार उपयोगी पडत होता. दूर खाली एक एस.टी. बस वळणे घेत येताना दिसत होती. महेशने माहिती दिली कि, आपण त्या वाटेवर काही वेळात पोचणार आहोत. आपल्याला ती वाट पार करून चढाई सुरु करायची आहे. बापरे ! म्हणजे इतके खाली उतरायचे आणि पुन्हा याच उंचीवर यायचे, या विचाराने पोटात धस्स झाले.
काही वेळात थोडे जंगल पार करून आम्ही एक एक करून त्या वाटेवर पोचलो. थोडी विश्रांती घेऊ असे एकमताने ठरले. स्वप्नीलने सोबत आणलेली संत्रे खाल्ल्यानंतर थोडी तरतरी आली. मला वाईट वाटले कि सर्वांना उपयोगी पडेल असे माझ्या जवळ काही नव्हते. फक्त महेशने काही वांगी आणायला सांगितली तेव्हढीच माझ्या सोबत होती. महेशने “तू फक्त जॉईन हो, आम्ही बाकीची काळजी घेऊ”, असे मला अश्वस्त केले होते. पण माझ्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्वांनी मिळून सोबत आणल्या होत्या. खिंडीतली वाट पार केली नि आता पुन्हा चढण लागली. आता लवकरच आपण त्या अर्ध्या वाटेवरील वस्तीवर पोहोचू आणि दुपारचे जेवण तिथेच करु असे अतुल म्हणाला. जेवणासाठी महेशने मेथीचे ठेपले सोबत आणले होते.
पण जंगलातून चालताना रस्त्यातच मधे एक जागा साफ केलेली दिसली. पाहिले तर छोटेसे मंदिर होते. अगदी दाट सावली होती. स्वप्नील ने कल्पना मांडली कि वस्तीवर जाऊन जेवण करण्यापेक्षा या ठिकाणीच जेवण करू. आपला वेळ वाचेल. कल्पना चांगली वाटली. मागून महेश आणि विराज येऊन जॉइन झाले, त्यांना पण ते योग्य वाटले. मग काय, तिथेच सगळा थाट मांडला. घरी एक दोन पोळ्या खाणारे आम्ही, सगळ्यांनी मिळून १५-१६ ठेपले असेच संपवले. भू भू चे त्यावेळी आश्चर्य वाटले, भूक तर त्याला पण लागली असणार. सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला तेव्हा खूपच थोडे त्याच्या वाट्याला आले. तरी पण आमच्याकडे तो खायला द्या म्हणून आशाळभूतपणे पाहत नव्हता. स्वप्नीलने त्याला खायला दिले. अत्यंत शांतपणे त्याने ते संपवले.
|
सेल्फी घेणारा डावीकडून पहिला स्वप्नील, त्याशेजारी महेश, नंतर अतुल, मी अन विराज… |
जेवण आटोपून आणि नंतर इलेक्ट्रॉल घेऊन पुढे निघालो. वस्तीजवळ
पोचलो. तिथे काही पाणी विकत घेतले. विचारपूस केली कि अजून किती वेळ लागेल तोरणा गाठायला.
तेव्हा दुपारचे १२:०० वाजले होते. वस्तीवरच्या लोक म्हणाले आम्ही दीड तासात जातो. तुम्ही
2 तासात पोहचाल. आमचा अंदाज वेगळा होता. अंदाजे ३ वाजतील असे वाटत होते. पाणी घेऊन
पुढे निघालो. पुढे जाण्याची वाट आम्हाला वस्तीवरच्या लोकांनी दाखवली.
|
अर्ध्या वाटेवरून दिसणारा तोरणा. |
चालण्याचा क्रम तोच होता. स्वप्नील, अतुल, मी, विराज नि महेश. आणि हो, स्वप्नील अतुलच्या पुढेही आमच्या सोबतचा भू भू चालत होता. वाट जंगलातली होती. लहान पायवाटेवरून आम्ही चाललो होतो. झाडी दाट असल्यामुळे दुपारी चालणे पण सुसह्य वाटत होते. आणि अचानक ते तिघेही माझ्या दिशेने उलट पळत येताना मला दिसले. मी तर बावचळलोच. पहिला अतुल, त्याच्या मागे स्वप्नील, नि त्याच्या मागे भू भू. माझ्या जवळ येऊन स्वप्नील म्हणाला आपल्याला मागे फिरावे लागेल. पुढे खूप मोठा हा आहे. मला तर नागाची शंका आली. कारण या निर्जन ठिकाणी त्याचीच जास्त भीती होती. तरी पण खात्री करण्यासाठी नक्की काय आहे हे मी त्याला विचारले. तर काय आहे ते सांगायचे राहिले बाजूला, स्वप्नील म्हणाला किती रे उद्योग या मोत्याला (नंतर मला कळाले महेश ने भू भू चे नामकरण पण करून टाकले होते, मोती म्हणून), अंगात जीव नाही पण त्या बैलावर धावून गेला. आणि मग तो सांड लागला आमच्या मागे.
हसण्यासारखीच गोष्ट होती. पण पुढे जायचे तर त्या सांडाचे काहीतरी करावे लागणार होते. 'मी पाहतो' असे म्हणून पुढे झालो तर एक नाही, अनेक सांड रांग लावून उभे होते. पहिले तर सुचेनाच काय करावे. नशिबाने त्यावेळी हातात काठी होती. जमिनीवर आपटली आणि “ह्याक ह्याक !” आवाज काढायला सुरुवात केली. सगळ्यांनीच मग तसे केले. आता मागे सरायची वेळ सांडाची होती. पहिला मागे सरला, आणि एक सरला म्हणून बाकीचे मागे पळायलाच लागले. जेव्हा वाटेतून ते झाडांच्या आश्रयाला मागे गेले, तेव्हा काठी समोर धरून मी पुढे झालो. सांड दबूनच मागे उभे होते. पण अजिबात खात्री नव्हती कि किती काळ ते असे दबून राहतील. पूर्ण कळपच होता. मी ओरडलो, पळा ! अक्षरशः पाय लावून पळत सुटलो. सगळ्यात पुढे तर मोत्या होता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर स्वप्नीलने मग मोत्याचा उद्धारच केला. म्हणाला अंगात जीव नाही, पण डेरिंग बघा याची. कोणाला पण भिडतो. थोडे पुढे गेलो तर मोत्या परत गुरगुरायला लागला. वाटेत तर काहीच नव्हते. नंतर लक्ष्यात आले कि हा वाटेमध्ये असलेल्या नंबराच्या दगडावर वर गुरगुरतोय. असल्या मनोरंजनाची तर आम्ही अपेक्षाच केली नव्हती. आम्हाला जास्तीतजास्त अपेक्षा होती ते महेशच्या वेळोवेळच्या सूचनांची. मोत्याचे वागणे आमच्यासाठी मनोरंजनच होते.
मध्ये मध्ये पाणी पिणे चालू होते. पुढे गेलेले मोती, स्वप्नील नि अतुल मला मधेच थांबलेले दिसले. काय करताहेत पहिले तर दोघे मिळून एक छोटीशी कॅरीबॅग फाडून त्यात मोत्याला पाणी पाजत होते. स्वप्नील म्हणाला हा खूपच धापा टाकत होता. इथे पाणी इतके जरुरी असून स्वनिल, अतुलने त्याचा विचार केला नाही. प्रॉब्लेम हा असतो कि ट्रेक करताना बरीच चढण चढायची असते, आणि त्यात सोबत वजन जास्त असले कि अजून त्रास होतो. पाण्याचे वजन त्यात जास्त असते. म्हणून गरजेपुरतेच पाणी प्रत्येक जण सोबत ठेवतो. मला दोघांची पण कमाल वाटली. रिकामी झालेली बाटली मी माझ्या सोबत परत घेतली. परंतु ती इतका वेळ सोबत बाळगणे थोडे गैरसोयीचे वाटले. मग मी रस्त्याच्या कडेला टाकून दिली. जेव्हा बाकीच्यांनी ते पाहिले, सगळे माझ्यावर तुटूनच पडले. “उचल ती बाटली, सोबत ठेव. आपण कचरा नाही करायचा”. योग्यच होते त्यांचे. वादाचे काही कारणच नव्हते. परत उचलून ती रिकामी बाटली सोबत घेतली. महेशने सुचवले कि त्याच्या बॅग मध्ये काही जागा आहे. तिथे ठेव म्हणून.
आता काही काळ चालल्या नंतर तोरणा अगदी जवळच दिसायला लागला होता. सगळ्यात जवळचे टोक दिसत होते ते म्हणजे तोरण्याची बुधला माची. आता विश्रांती घ्यायची इच्छा नव्हती. केव्हा एकदा तोरणा गाठतोय असे झाले. झपझप चालत निघालो. चढण सुरु झाली होती. बुधला माचीचे बुरुज आणि तटबंदी अगदी समोरच दिसत होते. सगळ्यात पुढे अर्थात मोत्या होता, मग मी. मागे अतुल, स्वप्नील, महेश, विराज येत होते. जेव्हा माचीच्या बुरुजाखाली पोचलो, तेव्हाच मागे वळून पाहिले. मागे कोणीच दिसत नव्हते. जागेवरच बसकण मारली. हळू हळू एक एक जण चढ चढून येताना दिसायला लागले. काही फोटो घेऊन वेळ पहिली. तर दुपारचा १:०० वाजला होता.
|
भुतोंडी बुरूजा आधीची चढण. मागे आम्ही आलेली वाट दिसत आहे. |
अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आम्ही तोरणा गाठला होता. सगळे सोबत आलो तेव्हा पुढे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी वाट चालू लागलो. पुन्हा एकदा स्वप्नील नि अतुलने मोत्याला पाणी पाजायचा कार्यक्रम आटोपला. पुढे आलो तर एक शिडी लागली. आम्ही सगळे एक एक करून शिडी पार केली. पण मोत्याला कुठे शिडी चढता येतेय ! त्याची घालमेल सुरु झाली, खूप ठिकाणाहून त्याने तो पॅच चढायचा प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झाले नाही. आम्ही त्याला वर जाऊन बोलावून झाले, पण त्याला एकट्याला तरी ते शक्य नव्हते. महेश नि स्वप्नीलने प्रयत्न करून पहिला, पण त्याला वर येणे जमले नाही. नंतर अतुल आणि मी पुन्हा शिडीवर गेलो. अतुलने त्याचा एक पाय नि मी एक पाय पकडून त्याला उचलून वर घेतले. आम्हाला भीती एकच होती कि मोत्याची नि आमची एका दिवसाची ओळख. जर तो चावला तर आमचे काही खरे नव्हते. पण इतका गुणी तो, त्याला समजले कि हे आपल्याला मदत करताहेत. आम्हाला भीती वाटेल अशी कोणतीही हालचाल न करता तो वर आला. आम्हाला खूपच सुटल्या सारखे वाटले.
आता थोडी विश्रांतीची गरज होती. बुरुजाखालीच एक बाबा सरबत विकत होते. पण त्यापेक्षा आम्ही सोबतचे संत्रे खाऊ असा विचार केला. महेशने बाबांना एक संत्रे दिले, आणि बाकीचे आम्ही खायला सुरुवात केली. थोडा आवाज यायला लागला म्हणून बाजूला पाहिले तर माकडांची एक मोठी टोळी आमच्याकडील संत्र्यावर टपून बसलेली दिसली. टपून तर बसलेले, पण पुढे येत नव्हते. बाबांनी सांगितले कि जर तुमचा कुत्रा सोबत नसता, तर तुमच्या हातात संत्रे राहिले नसते. माकडांनी नक्कीच पळवले असते. मोती उपयोगी ठरला म्हणायचा. आम्ही साली फेकून दिल्या दूर, तर माकडे साली खायला पळाले. आम्हाला जरा हायसे वाटले. बाबा म्हणाले तुम्ही आता सरबत नाही पिला तरी चालेल. पण पुढे एक ठिकाणी तुम्हाला बरे वाटेल, तिकडे प्या. असे म्हणून ते आम्हाला किल्ल्याची वाट दाखवत पुढे निघाले.
आम्ही पाहिले कि आता काही ट्रेकर्स या माचीपर्यंत आलेले होते. बऱ्याच वेळेनंतर आम्हाला ट्रेकर्स दिसू लागले होते. आता आम्हाला काही घाई नव्हती. कारण आम्ही तोरणा गाठला होता. आता मुक्कामाच्या ठिकाणी फक्त पोहोचायचे बाकी होते.
|
मोत्या, मी, अतुल, स्वप्नील नि विराज. (PC: महेश) |
|
पाठीमागे दिसणारी बुधला माची. आणि फोटोत दिसणारा अतुल.
(आता सुसह्य दिसणारी ही वाट.. मागच्या वेळी इथेच तोंडचे पाणी पळाले होते !! - महेश ) |
|
तोरण्यावरून होणारे राजगडाचे दर्शन. उजवीकडे दिसणाऱ्या डोंगर रांगेवरून आम्ही ट्रेक करत तोरणा गाठला. |
हळू हळू माचीचे निरीक्षण करत पुढे निघालो. दुरून एक बुरुज पहिला तर आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला. ढासळलेला बुरुज पूर्णतः डागडुजी करून पहिल्यासारखा केला होता. दगड वापरून पुन्हा बांधला होता. मी आत्तापर्यंत काही
किल्ल्यांवर केलेला खर्च पहिला होता. फक्त पायऱ्या बांधण्यापलीकडे काहीही केलेले दिसले नव्हते मला. आज पहिल्यांदा काहीतरी भरीव किल्लासंवर्धन केल्यासारखे वाटले. किल्ल्यांवर प्रेम करणाऱ्या कोणालाही सुखावणारे ते दृश्य होते. राजस्थान मधले किल्ले जेव्हा पाहिले, तेव्हा तर आपल्या इथल्या किल्ल्यांची अवस्था फारच विदारक वाटली होती मला. आज दृश्य थोडे तरी बदलल्याचा आनंद झाला मला.
|
विराज.. पहिला मोठा ट्रेक करत होता. |
|
स्वप्नील, मी आणि मागे डागडुजी केलेला तोरण्याचा बुरुज |
तो बुरुज ओलांडून पुढे आलो, आणि एका थंड जागेत प्रवेश केला. इथे विश्रांती घेतल्या शिवाय पुढे जाणे तर शक्यच नव्हते. मी नि मोत्या विसावलो. सगळे जण आले. बाबा तर आमच्या अगोदरच तिथे वाट पाहत थांबले होते. आता सरबत प्यायला हरकत नव्हती. प्रत्येकाने मनसोक्त सरबत पिले. महेशने बाबांना पण त्यांचेच सरबत विकत घेऊन प्यायला दिले. कारण ते स्वतः तर नक्कीच पिणार नव्हते. बाबांनी सांगितले कि ही जागा कोणत्याही ऋतूमध्ये इतकीच थंड असते. थोडा वेळ थांबून पुढे निघालो. किल्ल्याचे बांधकाम (डागडुजी) खूपच जोरात चालली होती. ३ रोपवे बांधले होते दगड, बांधकाम साहित्य पायथ्यापासून किल्ल्यावर आणण्यासाठी.
आम्ही एकदाचे गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात पोचलो. पाहिले तर मंदिर अगदी फुल होते. बांधकाम करणारे मजूर आणि काही ट्रेकर्स तिथे मुक्कामाला होते. आम्ही जागा मिळेल तिथे आमची पथारी पसरली. आणि लगेच अंग टाकले. खूपच दमलो होतो. स्वप्नील लगेच गाढ झोपी गेला.
इतक्यात एक ट्रेकर आला. देवीचे दर्शन घेतले आणि निघाला पण. महेशने त्याला थांबवून विचारले कि “मी तुम्हाला राजगडाहून येताना पाहिले. लगेच चालले काय ?” तो म्हणाला “आम्ही ४ जण आहोत. गुरुवारी आम्ही सिंहगडावर चढलो, नंतर तसेच पुढे राजगडावर आलो. सकाळी पुन्हा राजगडावरून तोरण्याला आलो. माझे अचानक काही काम आले म्हणून मी ट्रेक अर्धवट सोडतोय. पण माझ्या सोबतचे आता रायगडावर निघाले आहेत”. ऐकूनच दमलो आम्ही. किती क्रेझी लोक असतात ! तोरणा ते रायगड करायला २ दिवस लागतात. आणि त्यात हे तितकेच किंबहुना जास्त अंतर अगोदरच कापून आलेत. आम्ही खूपच किरकोळ भासू लागलो त्यांच्या पुढे.
ते ऐकून थोडी विश्रांती घेऊन महेश म्हणाला “चला, थोडे पाय मोकळे करून येऊ”. ऐकून हसू आले. जणू काही सकाळपासून ऑफिस मध्ये बसून होतो, तेव्हा आता पाय मोकळे करायचे आहेत. निघालो. तटबंदीचे चालू असलेले काम पाहिले. पुढे जाऊन पूर्वेला असलेली झुंझार माची पहिली.
|
सदर |
|
झुंझारमल माची |
|
एनर्जेटिक चहा आणि पारले जी |
थोडा किल्ला फिरलो. नंतर खाली असलेलं पाण्याचे टाकं पाहायला जायचे ठरले. सोबत फ्रेश होण्यासाठी साहित्य घेतले आणि निघालो. ते पाणी गडावर पिण्यासाठी वापरतात. थोडे पाणी घेऊन तोंड धुतले आणि तिथेच रेंगाळलो.
|
पाण्याच्या टाक्यावर बसलेलो स्वप्नील, महेश, मी, अतुल आणि विराज |
सूर्यास्त व्हायला आला होता. तटबंदी गाठली. तेथे काही ट्रेकर्स
ने टेन्ट उभे केले होते. त्यांना मी जॉईन केले. बोलताना समजले कि ते पुण्याचेच आहे.
मला ट्रेकर्सचे आत्तापर्यंत खूपच चांगले अनुभव आले आहेत. किल्ल्याखाली ते वेगळे वागतात.
पण एकदा किल्ल्यावर गेले कि कुठून त्यांच्यात माणुसकी येते माहित नाही. प्रत्येक जण
दुसऱ्याला मनापासून मदत करताना दिसतो. दुसऱ्याला आपल्यात मिसळून घेतो. स्वतःजवळची वस्तू
विनासायास दुसऱ्याला देतो. माहित नाही असे का.
|
ट्रेकर्स ने उभारलेले टेन्ट |
|
तोरणा वरील सूर्यास्त |
|
सुंदरसा सूर्यास्त |
|
अतुल, महेश आणि स्वप्नील |
त्या ग्रुप सोबत सूर्यास्त
एन्जॉय केला. आणि परत निघालो माझ्या ग्रुप कडे. परत निघालो ते सरपण गोळा करत. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. मंदिरात आलो आणि पाहिले तर मंदिर अगदी फुल भरलेले. बाजूचा परिसर पण व्यापला गेला होता ट्रेकर्सने. मंदिरात जागा शिल्लक नसेल आपल्यासाठी असे वाटले, पण माझ्या सोबतचे ट्रेकर्स अनुभवी होते. बाहेर पडण्यापूर्वीच त्यांनी स्लीपिंग बॅग्स उघडून पसरून ठेवल्या होत्या. अनुभवी ट्रेकर्स ! आता सुरु झाली खिचडीची तयारी. मघाशी टाक्यावर गेलो तेव्हा पातेल्याला आमच्या कुक ने, स्वप्नील ने मातीचा लेप लावून घेतला होता. आणि ते भरून आणायचे काम मी नि विराज ने केले होते. ज्याला कुकिंग येत नाही, त्यांच्या वाट्याला असेच काम येते. चूल पेटवली. आणि वांगी भाजली. स्वप्नीलने भरीत बनवले.
|
किचन क्रू |
|
स्वप्नीलने बनवलेली अप्रतिम खिचडी |
खूपच कमी साहित्यात स्वप्नील ने अप्रतिम खिचडी बनवली. पण इतकी भूक लागली होती कि सोबतच्या थेपल्यांवर आम्ही तुटून पडलो. थोडे खाल्ले मग ठरवले कि आता बास. खिचडी तशीच राहील. खिचडी आणली नि सगळे परत तुटून पडले. पोटभर खाल्ले. स्वप्नीलची सगळ्यांनी मनापासून तारीफ केली. झोपण्या अगोदर कार्ड्स खेळलो. आणि झोपी गेलो. सकाळी उठून सूर्योदय पाहायला सगळे मंदिराच्या पायऱ्यांवर जमा झालो. खूप सारे टेन्ट्स दिसत होते. कळालेच नाही कि इतके सारे ट्रेकर्स केव्हा आले ते.
|
सूर्योदया नंतर ग्रुप फोटो |
परत पाण्याच्या टाक्यावर जाऊन ब्रेकफास्ट आटोपला. आणि किल्ला उतरायला सुरुवात केली.
|
मुख्य दरवाजा |
|
तोरणा उतरताना |
उतरतानाच एका मित्राचा (संदीपचा) फोन आला. आम्ही सोबत खूप वेळा ट्रेकिंग केले आहे. जेव्हा त्याला समजले कि मी तोरणा उतरतोय, तेव्हा त्याचा प्रश्न होता कि उतरायला चढला केव्हा ? मी त्याला सगळा प्रोग्रॅम सांगितला, तेव्हा तो म्हणाला कि मी नक्की जॉईन केले असते. आणि मला पण तेच अपेक्षित होते. मला अजूनही आठवते कि संदीप, मी नि धनश्री (संदीप च्या सौ.) मिळून ४ दिवसात सलग ८ किल्ले ट्रेक केले होते. संदीप खूपच उत्तम ट्रेकर. मला त्याची कमतरता प्रत्येक ट्रेकला जाणवते. त्याने मला सांगितले कि त्याची स्लीपिंग बॅग घरी आहे, येऊन घेऊन जा. या ट्रेक मध्ये मला एक गोष्ट समजली, कि जर लॉन्ग डुरेशनचे ट्रेक करायचे असतील तर चांगले ट्रेकिंग गियर असणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात ट्रेकिंग शूज, सॅक, स्लीपिंग बॅग आणि वॉटर ब्लॅडर असावेच. पाहू, केव्हा घेणे होतंय ते.
खाली उतरलो. आता तोरण्याच्या बऱ्याच वरपर्यंत चांगला सिमेंटचा रोड झालाय. गाड्या बऱ्याच वर येऊ शकतात. दुर्गम तोरणा आता थोडा सुसह्य वाटू लागला आहे. या किल्ल्याला बरेच रॉक क्लाइम्बिंगचे पॅच आहेत. चांगले वाटते ट्रेक करायला. आता सगळीकडे रेलिंग चे काम चालू आहे. पाहिल्यासारखे धोकादायक नाही राहिले.
खाली वेल्हे गावात उतरलो. काही वर्षापूर्वीचे वेल्हे आणि आताचे वेल्हे खूपच बदल आहे. नवीन एस.टी. स्थानक गावाबाहेर आहे. स्वप्नील नि अतुल पुढे होते. त्यांचा फोन आला कि “पळत या, एस.टी. बस निघायच्या तयारीत आहे”. आम्ही निघालो. कारण परत राजगडाच्या पायथ्याला जाऊन कार आणायची होती. बस सोडून जीप मध्ये बसलो. आणि राजगडासाठीच्या फाट्यावर उतरलो. स्वप्नीलने एका बाईक वाल्याकडून लिफ्ट घेतली आणि तो कार आणण्यासाठी निघून गेला. आम्ही वाटेत एक नदी लागली तिकडे मोर्चा वळवला. मनसोक्त डुंबलो. ट्रेकिंगचा बराचसा शीण निघून गेला. स्वप्नीलने पण थोड्या वेळात येऊन आम्हाला जॉईन केले. ट्रेकिंगची समाप्ती इतकी सुखद होईल असे वाटले नव्हते.
|
अतुल (समोर) आणि उजवीकडे महेश आणि विराज |
खूप सारी एनर्जी घेऊन परत पुण्याच्या वाटेला लागलो होतो. महेशचे प्लांनिंग अगदी फ्लॉलेस होते. काहीएक अडचण आली नाही. परत निघालो ते पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करत.....