Sunday, November 13, 2016

गाठीभेटी

खरे तर हा लेख लिहायचा असा काही प्लॅन नव्हता. पण 6 तारखेला आम्ही दहावी चे मित्र भेटलो आणि अचानक डोक्यात प्रकाश पडला.. अरे यावर निदान चार ओळी तरी लिहिता येतीलच की आणि...
नाहीच जमले काही लिहायला
तर चारोळी येईल की मदतीला !!

(बेंगलोर ते चंदिगड 2:30 तासाची फ्लाईट आहे, त्यामुळे बसल्या बसल्या लिहायचा प्रयत्न करत आहे.)

लेखाचे शीर्षक काय असावे हाच विचार करत होतो, भेटीगाठी की गाठीभेटी.. थोडा वेळ विचार केला, नक्की काही सुचेना, म्हणून मग 10-20 करत गाठीभेटी हेच फायनल केले!! असो, प्रस्तावानेमध्येच जास्त वेळ न घुटमळता आता विषयाकडेच वळतो..

तुम्हाला माहीतच आहे, मित्र म्हणजे माझा जीव की प्राण ! (बहुदा किंचितशी अतिशयोक्ती असेल). त्यामुळे मी मित्रांना (म्हणजे इंग्लिश मधले फ्रेंड्स बर का!!) भेटायचा प्लॅन करत असतो. परंतु, मित्रांना भेटणे दरवेळी शक्य होत नाही. पुण्यातल्या पुण्यात भेटायचे ठरवले तरी ऐनवेळी कॅन्सल पण होते.  एवढे असूनही नोव्हेंबर (2016) मध्ये भरपूर मित्रांच्या भेटी झाल्या. सगळ्या जरी प्लॅनिंग प्रमाणे झाल्या असतील, तरी त्या एकाच महिन्यात झाल्या हा निव्वळ योगायोग!
त्याच भेटींचा हा धावता वृत्तांत...

भेट क्र. १: २ नोव्हेंबर, आजरा 
बालपणीच्या मित्रांची भेट (पर्वणीच म्हणायला हवे..)

खरे तर या भेटीबद्दल लिहावे तेवढे कमी, निदान एक ब्लॉग तरी होईल. पण थोडक्यात आवरतो.
काळाच्या ओघात दूर गेलेले मित्र, काही विस्मरणात ही.. भेट होईल याची अजिबात खात्री नाही, व्हाट्सअँप मुळे सारे एकत्र आले, दररोज गप्पा सुरु झाल्या आणि भेटीचा योग घडून आला. बालपणीचे मित्र, शाळा, सर्व जुन्या आठवणी..सर्व गोष्टींना २६ वर्षांनंतर उजाळा मिळाला अन् आनंदाने डोळे भरून आले.

रजिस्ट्रेशन करताना... 


इ. १० वी १९९२-९३ बॅच (मीच एकटा odd man होतो !!!)


भेट क्र. २: ६ नोव्हेंबर, डेक्कन जिमखाना, पुणे
दहावीच्या पुण्यातील मित्रांची भेट

पुण्यात असणारे मित्र वारंवार भेटत असतात, असा एक गोड गैरसमज बाकी (म्हणजे पुण्यात नसणाऱ्या) मित्रांमध्ये असतो. आता त्यांना काय माहीत, पुण्यातले लोक कित्ती बिझी असतात ते, नाही का!!
In fact, पुण्याबाहेरील मित्रच पुण्यात आल्यावरच खात्रीशीर भेटी होत असतात. त्यातलीच ही एक भेट.
रश्मी (तीच ती, जिच्या घरी मी अमेरिकेत पाहुणचार झोडला होता!!) अमेरिकेतून भारतामध्ये २ महिने सुट्टी साठी आली होती. हा धागा पकडून पुण्यातील मित्रांनी भेटायचे ठरविले आणि यथावकाश रद्दबादल ही करविले!! ३ तारखेला संतोषचा पुण्यात आल्याचा मेसेज आला आणि भेटीच्या बेताने पुन्हा उचल खाल्ली. काहीच वेळात (म्हणजे १ दिवस, बर का) सर्व काही फायनल झाले आणि डेक्कन ला भेट घडून आली आणि पुण्याबाहेरील मित्रच ( भेटीच्या वेळी नेमका संतोष नव्हता, ही बाब वगळता) भेटीसाठी catalyst असतात यावर शिक्कामोर्तब झाले!!

                                    (L2R: कृपाल, उमेश, अतुल, महेश, रितेश, प्रताप, श्वेता, स्मिता, रश्मी, सारिका )

भेट क्र.३: ७ नोव्हेंबर, कर्वेनगर, पुणे
चैतन्य, प्रशांत आणि मी

एकत्र काम केलेले आम्ही तिघे, बघायला गेलो तर तिघेही पुण्यात, तरीही एकत्र भेटीचा योग घडून येत नाही. ऑक्टोबर मध्ये भेटायचे ठरवले, पण काही ना काही कारणाने पुढे पुढे जात होते. शेवटी चैतन्य ने ultimatum दिल्याने ७ तारखेला finally भेट झाली.

भेट क्र. ४: १२ नोव्हेंबर, बेंगलोर
गुट्टाला गँग ची भेट

हैदराबाद ला एकाच वेळी एकाच कंपनी मध्ये नोकरीला लागलेले मित्र..एकत्र राहिल्यामुळे झालेली घनिष्ठ मैत्री आणि पक्के झालेले बंध म्हणजेच गुट्टाला गँग!!
नोकरीनिमित्त सध्या बरेचसे बेंगलोरला असल्यामुळे भेट होत नाही, त्यामुळे बेंगलोरला आलो की या सर्वांची अवश्य भेट घेतो (इथे ही बाहेरील मित्रच catalyst !!). मागील वेळी आम्ही सर्व एअरपोर्ट वर भेटलो होतो. यावेळी हेमंतच्या penthouse मध्ये राहण्याचा, रघू चे palace पाहण्याचा, गुट्टाला लेडीज ग्रुप ला भेटण्याचा, GNX (गुट्टाला नेक्स्ट जनरेशन) बरोबर खेळण्याचा आणि सदाचा वाढदिवस साजरा करण्याचा योग जुळून आला! रात्री खूप वर्षानंतर गाण्याची मैफिल जमली होती. 





तर, एकाच महिन्यात घडलेल्या या ४ भेटी.. अजूनही महिना संपायचा आहे. 
२७ नोव्हेंबर ला हैदराबाद ला जात आहेच!  त्यामुळे एक दोन भेटी अजून होतील हे नक्की...

#मम 

1 comment:

महेश मसुरकर said...

म्हटल्याप्रमाणे अजून १ भेट झालीच..
चिन्मय यु एस वरून परत आला म्हणून तृप्ती ने पुण्यात एक छोटीशी भेट ठरवली.
शनिवारी (१९ नोव्ह ) तृप्ती, सुजाता, सुप्रिया, चिन्मय, सुजय आणि मी जमलो होतो.
ढोकळ्याबरोबरच तृप्ती ने केलेले उकडीचे मोदक आणि सुप्रियाचे चिरोटे असा मस्त बेत होता ☺ ☺